CoronaVirus कांदा-भाजीसह फळ मार्केट उद्यापासून बंद.

बाजार समितीचा निर्णय : धान्य बाजार मात्र सुरू


नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा, बटाटा, भाजीसह फळ मार्केट ११ एप्रिलपासून बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईमध्ये भाजीपाल्याची थेट विक्री करणाऱ्यांना मात्र परवानगी आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी धान्य मार्केट सुरूच राहणार आहे.



बाजार समितीच्या मसाला मार्केटमधील एका व्यापाऱ्यास कोरोनाची लागण झाल्यामुळे माथाडी कामगारांसह व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घाऊक व्यापारी भाजीपाला महासंघ, फळ बाजार आवारातील फ्रंट ऑफ युनायटेड फ्रुट्स असोसिएशन, कांदा-बटाटा आडत व्यापारी संघ या व्यापारी संघटनांनी मार्केट बंद ठेवण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनीही कामगारांनी कामावर येऊ नये, असे आवाहन केले होते. यामुळे बाजार समिती प्रशासनाने गुरुवारी बैठकीचे आयोजन केले होते. यात कांदा-बटाटा,
भाजीपाला व फळ मार्केट ११ एप्रिलपासून पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.